खाते बदल फाईल निकालात काढण्यास तांत्रिक अडचण : महसूल विभागात 696 फाईल प्रलंबित
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या महसूल विभागात खाते बदलच्या 696 फाईल प्रलंबित आहेत. या फाईल निकालात काढण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. मात्र यावषीची कर भरलेली पावती सादर करणे बंधनकारक असल्याने तांत्रिकदृष्टय़ा अडचण निर्माण झाली आहे. कर भरलेली पावती जोडल्यानंतरच या फाईल निकालात निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या महसूल उपायुक्तांच्या वेळकाढूपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून आता कर भरलेली पावती सादर केल्याशिवाय फाईल निकालात निघणे तांत्रिकदृष्टय़ा अडचणीचे बनले आहे. अनेक मालमत्ताधारकांनी खाते बदल करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले होते. वारसा हक्काप्रमाणे, वाटणीप्रमाणे तसेच खरेदी-विक्रीप्रमाणे खाते बदल करण्यासाठी अर्ज केले होते. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी अर्जदारांनी केली होती. मात्र विविध कारणांमुळे आणि तत्कालीन महसूल उपायुक्तांच्या दुर्लक्षामुळे खाते बदलच्या फाईल निकालात काढण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे तब्बल 696 फाईल निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
महसूल उपायुक्तांनी खाते बदलच्या फाईल निकालात काढण्यासाठी पैशांची मागणी केली होती. तसेच अनावश्यक कागदपत्रांची विचारणा नागरिकांकडे केली होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांनी महसूल उपायुक्तांच्या विरोधात महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. तरीदेखील या फाईल निकालात काढण्यात आल्या नव्हत्या. महसूल उपायुक्तांची बदली झाल्यानंतर नव्याने रूजू झालेल्या महसूल उपायुक्तांना या फाईल निकालात काढण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी केली आहे. पण या फाईल निकालात काढण्यास तांत्रिक मुद्दा अडचणीचा बनला आहे.
चालू वर्षाची घरपट्टी भरणे बंधनकारक
ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याबरोबरच चालू वर्षाचा करभरणा केलेली पावती जोडणे बंधनकारक आहे. अर्जदारांनी 2021-22 या वर्षाची कर भरलेली पावती जोडली होती. पण आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने 2022-23 या आर्थिक वर्षाची घरपट्टी भरलेली पावती जोडणे आवश्यक आहे. ही पावती जोडल्यानंतरच फाईल निकालात निघतील, अशी माहिती संगणक विभाग प्रमुखांनी महसूल विभागाला दिली आहे. पण खाते बदलसाठी अर्ज करून 6 महिने ते वर्ष होत आल्याने नव्याने दाखल होणाऱया मालकांच्या नावे घरपट्टी चलन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे खाते बदलच्या फाईल निकालात काढण्यास नवीन अडचण निर्माण झाली आहे. पण घरपट्टी भरल्यानंतरच फाईल निकालात काढता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी चालू वर्षाची घरपट्टी भरणे बंधनकारक आहे.