अप्रतिम, अलौकिक रोषणाई ः रामनगरीने रचला इतिहास ः पंतप्रधानांनी केली सरयूची पूजा
अयोध्या / वृत्तसंस्था
दिवाळीच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीरामाच्या अयोध्येत 15 लाखाहून अधिक दिवे लावण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या विक्रमाचे प्रमाणपत्र घेतले. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सरयूची पूजा करून आरतीही केली. तसेच राम की पायडी येथे लेझर शोच्या माध्यमातून दाखविलेली राम कथाही त्यांनी पाहिली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी रामलल्लाचे दर्शन घेत पूजाही केली.
दरवषीप्रमाणे यंदाही अयोध्या नगरी दीपोत्सवासाठी सज्ज झाली होती. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिह्यात म्हणजेच रामजन्मभूमीवर दरवषी दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या दीपोत्सवात सर्वाधिक पणत्या पेटवून विश्वविक्रम नोंदवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. सरयू घाटावर रविवारी तिन्हीसांजेच्या सुमारास 15 लाख 76 हजार दिवे लावून अयोध्येने इतिहास रचला आहे. लेझर शोनंतर सरयू घाटासह परिसरात जबरदस्त विद्युत रोषणाई करण्यात आली. घाटावर एकाचवेळी लाखो दिवे पेटवून विश्वविक्रम नोंदवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही राम लल्लाला प्रार्थना केली. तसेच प्रदक्षिणा घालून पंतप्रधानांनी सुखी आणि बलशाली राष्ट्रासाठी शुभचिंतन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळीच अयोध्यानगरीत दाखल झाले होते. सुरुवातीला त्यांनी येथील मंदिरकामाचा आढावा घेतला. याप्रसंगी राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. त्यांनी राम मंदिराच्या बांधकामाच्या जागेची पाहणी केली. राममंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय हेही उपस्थित होते.
हीनतेचे बंधन आम्ही तोडले ः पंतप्रधान
दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापूर्वी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या साखळय़ा आम्ही तोडल्या आहेत. भगवान राम हे सर्वांच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत प्रभू रामाची इच्छाशक्ती भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे सांगत त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
विदेशी फुलांची विशेष सजावट
यावषी योगी सरकारकडून अयोध्येत भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री रामजन्मभूमी आणि रामलल्ला येथे फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. फुलांसाठी वापरण्यात आलेली काही फुले विदेशातील असल्याचेही आयोजक आणि आरास करणाऱयांकडून सांगण्यात आले. 36 हून अधिक घाटांवर खास सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 22 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी मिळून या भव्य अयोध्या दीपोत्सवाची तयारी केली. याशिवाय सुंदर वाळू शिल्पही साकारण्यात आले होते.
भाविकांबरोबरच पर्यटकांची गर्दी
दीपोत्सवामुळे देशात आणि जगात अयोध्येचा महिमा वाढला आहे. येथे दरवषी दिवा लावण्यावा नवा विक्रम नोंद होत असतो. या दीपोत्सवामुळे अयोध्येकडे पर्यटकांची पेझ वाढली आहे. अयोध्येत येणाऱया देशी-विदेशी पर्यटक आणि भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. 2017 च्या पहिल्या दीपोत्सवादरम्यान, सरयूच्या काठावर प्रज्वलित केलेल्या दिव्यांची संख्या 1.71 लाख होती. यंदा जवळपास 16 लाख दिवे लावण्यात आले.