वारणानगर,प्रतिनिधी
वारणा नदीवरील बच्चे सावर्डे -मांगले दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावर सावर्डेच्या ता.पन्हाळा बाजूचा रस्त्याचा भराव खचल्याने वाहतूक धोकादायक झाली होती याची तात्काळ दखल घेत पोलीस पाटील, होमगार्ड व प्रवाशी वाटसरु यानी श्रमदानाने भराव भरून या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून हा मार्ग वाहतुकीस सुरळीत केला.
वारणा नदीला आलेल्या पूरात गेली काही दिवस सावर्डे -बंधारा व बाजूचा रस्ता पाण्याखाली गेला होता दोन दिवस पाऊसाचा जोर ओसरल्यावर बंधार्यावरील पाणी उतरल्यावर सावर्डेकडच्या बाजूचा रस्त्याचा पूर्ण भरावच खचून गेला असून हा मार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे प्रवाशानी यामार्गावर येवू नये चार चाकी दुचाकीस्वार यानी रस्ता दुरुस्त होत नाही तो पर्यन्त प्रवास करू नये असे आवाहन पोलीस पाटील सागर यादव यानी केले होते या संदर्भाने तरुण भारतच्या सोशल मिडीयावर फोटोसह सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
बंधाऱ्या जवळचा खचलेला रस्ता पोलीस पाटील, होमगार्ड, वाटसूरू प्रवाशानी भरला
वारणा नदीवरील सावर्डे – मांगले बंधाऱ्या जवळ सावर्डे ता.पन्हाळाच्या बाजूने पूराच्या पाण्याने खचलेला धोकादायक रस्ताच आपत्तीला कारणीभूत ठरू नये याची काळजी घेत बच्चे सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव,कोडोली पोलीस ठाण्या मार्फत बंधाऱ्याच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असणारे होमगार्ड अतुल मरगाळे,सुनील वकटे आणि या मार्गावरील वाटसरू प्रवाशी यानी श्रमदानाने काही तासातच भराव भरला आणि या बंधार्यावरील वाहतुक सुरळीत केली या तत्परतेने बजावलेल्या आपत्ती व्यवस्थाना बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.