पावसाने थोडी उसंत दिल्याने भाविकांची मोठी गर्दी; मनोरंजनाच्या साधनांचा घेतला मनमुरादा अस्वाद
सांगरूळ / वार्ताहर
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला आणि शेकडो वर्षाची परंपरा असलेला सांगरूळचा मोहरम (अलावा)पारंपारिक पद्धतीने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपारिक वाद्याच्या गजरात अभिराचे उधळण करत भक्तिमय वातावरणात ताबूत विसर्जन करण्यात आले. हिंदू मुस्लिम एकत्र येऊन मोहरम साजरा करण्याची शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा ग्रामस्थांनी यावेळी कायम ठेवली आहे. मोहरम निमित्त आलेल्या मनोरंजनांच्या साधनांचाही लोकांनी मनमुराद आस्वाद घेतला.
|
पहिल्या दिवशी खईत कुदळ मारून मोहरमची सुरुवात झाल्यानंतर दररोज विविध धार्मिक कार्यक्रम झालेत .शुक्रवारी खत्तलरात्र हा मोहरमचा मुख्य दिवस या दिवशी नवसाची बकरी देणे, दंडवत, नैवेद्य दाखवणे, ओटी भरणे यासारखे धार्मिक कार्यक्रम झालेत. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या दिवशी रात्री खई तोडणे तसेच पंजा भेटीचे कार्यक्रम उत्साही वातावरणात झालेत.
ताबूत विसर्जनाच्या वेळी अभिराची उधळण करत पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीने पंजे विसर्जनासाठी मिरवणुकीने नेण्यात आले. यावेळी करबले खेळणे, शिगा लावणे यासारखे पारंपरिक खेळ खेळण्यात आलेत.
मोहरम निमित्त गगनचुंगी पाळणे ब्रेक डान्स यासारखी मनोरंजनाची साधने दाखल झाली होतीत .बाल चमूसह महिला, ग्रामस्थ व मोहरमला येणाऱ्या परिसरातील भाविकांनी याचा मनमुराद आस्वाद घेतला. पावसाने थोडी उसंत दिल्याने या मनोरंजनाच्या साधनाकडे मोठी गर्दी झाली होती.
सांगरूळचा मोहरम हिंदू मुस्लिम मोठ्या भक्तीभावाने शेकडो वर्षापासून साजरा करत आहेत .यामुळे येथे कोणत्या पद्धतीची जातीय तेढ निर्माण होत नाही. तरीही पोलीस प्रशासनाने सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत चव्हाण, अंमलदार सुशांत धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता .