जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल
बेळगाव : आंदोलने, मोर्चे हे रोजचेच ठरलेले आहेत. विविध संघटना कित्तूर चन्नम्मा चौक येथे उपस्थित राहून त्या ठिकाणी रास्तारोको करत असतात. याचबरोबर निषेधार्थ पुतळेदेखील जाळत असतात. मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आंदोलने करण्यास मुभा देऊ नये, अशा मागणीचे निवेदन जायंट्स ग्रुपतर्फे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मागणीची दखल घेऊन लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. याचबरोबर यापुढे आंदोलन करण्यासाठी सर्किट हाऊस समोरील जागा दिली जाईल, असे ठोस आश्वासन जायंट्सच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कित्तूर चन्नम्माजवळ सिव्हिल हॉस्पिटल, न्यायालय याचबरोबर इतर सरकारी कार्यालये आणि शाळा महाविद्यालये आहेत. शहराचा हा एक मुख्य चौक आहे. या चौकाला अनेक रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे नेहमी वर्दळ असते. तेव्हा या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आंदोलने करण्यास मुभा देऊ नये, असे या निवेदनात म्हटले आहे. दररोज एखादी संघटना येथे आंदोलन करत असते. रास्तारोको केल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे नुकसान होते. बऱ्याचवेळा रुग्णवाहिकादेखील येत असतात. त्यांनादेखील याचा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा अशा सतत गजबजणाऱ्या चौकांमध्ये आंदोलन करण्यास कोणत्याही संघटनेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. आंदोलनमुक्त झोन म्हणून या चौकाला जाहीर करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्याजवळ असलेली 4 एकर सरकारी जमीन ही पूर्वी आयकर विभागाला देण्यात आली होती. मात्र ती जमीन आता जिल्हा प्रशासनाच्या नावे झाली असून निश्चितच त्या ठिकाणी आंदोलकांसाठी जागा राखीव ठेवली जाईल, असे सांगितले. याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांनाही यावेळी सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवेदन देण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष सुनील मुतगेकर, उपाध्यक्ष अरुण काळे, मोहन कारेकर, मदन बामणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.