प्रतिनिधी,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील मार्च-एप्रिल 2023 उन्हाळी सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत.बुधवारी बीकॉम सेमिस्टर सहाचा अॅडव्हान्स अकौंटन्सीचा पेपर नंबर चार एका महाविद्यालयात फुटला असल्याची माहिती परीक्षा विभागाला समजली.परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी तातडीने प्रश्नपत्रिकाच बदलली.संबंधीत महाविद्यालयावर परीक्षा प्रमाद समितीच्या निर्णयानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत विद्यापीठात बैठक सुरू होती.
परीक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून फिरत्या पथकाची नियुक्ती केली आहे.तरीही बुधवारी पेपर फुटीचा प्रकार समोर आला.बीकॉम सेमिस्टर सहाचा अॅडव्हान्स अकौंटन्सीचा पेपर दुपारी 2.30 वाजता होता.पेपर फुटल्याची वार्ता कळताच परीक्षा विभागाने तातडीने पेपर बदला.बदललेला पेपर एसआरपीडीच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांना पाठवण्यात आर्धा तास गेला.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात बदललेली प्रश्नपत्रिका दुपारी 3 वाजता मिळाली.
माहिती घेवून कारवाई करणार
पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यामुळे तातडीने प्रश्नपत्रिका बदलली. घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि संपूर्ण माहिती घेवून दोषींवर कारवाई करणार आहे.
डॉ. अजितसिंह जाधव (परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, शिवाजी विद्यापीठ)