वृत्तसंस्था /बेंगळूर
व्हिवो पुरस्कृत येथील कंठीरव्वा इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नवव्या प्रो लिग कबड्डी स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि यु मुम्बा संघाने आपले विजय नोंदविले. बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीचा तर यु मुम्बा संघाने गुजरात जायंटस्चा पराभव केला.
बुधवारच्या बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या कबड्डीपटूंनी आपल्या भक्कम बचाव तंत्राच्या जोरावर दबंग दिल्लीचा 35-30 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. बंगाल वॉरियर्सच्या मनिंदरसिंग आणि नवीनकुमार या हुकमी रायडर्सनी प्रत्येकी 10 गुण नोंदविले. त्याचप्रमाणे बंगाल वॉरियर्सच्या बचावफळीतील वैभव गर्जे आणि गिरीश इमाक यांनी अनुक्रमे 6 आणि 5 गुण मिळविले. सामन्यातील 11 व्या मिनिटाला दबंग दिल्लीने बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद केले. पण त्यानंतर बंगाल वॉरियर्सने आक्रमक चढाया करत मध्यंतरापर्यंत 15-13 अशी आघाडी मिळविली. बंगाल वॉरियर्सने अखेर हा सामना पाच गुणांच्या फरकाने जिंकला. नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील बेंगळूरच्या टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. आता ही स्पर्धा पुढे शुक्रवारपासून पुण्यातील बालेवडीच्या शिव छत्रपतीच्या क्रीडा संकुलात खेळविली जाईल.
बुधवारच्या दुसऱया एका सामन्यात गुमान सिंग आणि हैदर अली इकरामी यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यु मुम्बा संघाने गुजरात जायंटस्चा 37-29 अशा गुणांनी पराभव केला. यु मुम्बाच्या गुमान सिंग आणि हैदर अली इकरामी एकुण 22 गुण मिळविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 16-16 असे बरोबरीत होते. मात्र उत्तरार्धात यु मुम्बाचा कर्णधार सुरिंदर सिंग तसेच गुमान सिंग यांनी आपल्या संघाला अधिक गुण मिळवून दिले. 35 व्या मिनिटाला यु मुम्बाने गुजरात जायंटसचे सर्व गडी बाद करून आपल्या संघाची आघाडी वाढवत अखेर 37-29 अशा 8 गुणांच्या फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केला.