वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आगामी महिलांच्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने शुक्रवारी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज बेरेनडिने बेझुडेनहॉटचा समावेश करण्यात आला आहे.
29 वषीय बेरेनडिनेचे तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन होत आहे. यापूर्वी तिने आपला शेवटचा सामना 2020 च्या जानेवारीमध्ये खेळला होता. अलीकडेच बांगलादेश आणि न्यूझीलंड महिला संघात टी-20 आणि वनडे मालिका खेळविण्यात आली होती. या मालिकेत खेळलेल्या न्यूझीलंड संघामध्ये केवळ एक बदल या आगामी स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या बेरेनडिनेने 2014 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले असून तिने आतापर्यंत 9 वनडे आणि 9 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईनकडे सोपविण्यात आले आहे.
न्यूझीलंड महिला संघ- सोफी डिव्हाईन (कर्णधार), सूझी बेट्स, मॅडी ग्रीन, बेरेनडिने बेझुडेनहॉट, इडेन कार्सन, लॉरेन डाऊन, बुक हॅलिडे, हेलि जेनसेन, फ्रेन जोनास, अमेलिया केर, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया फ्लिमेर, हॅना रोवे आणि लि तेहुहु.