साटवली मार्गावरील खावडी-कोंड्ये सीमेजवळील उतारातील घटना
लांजा प्रतिनिधी
तालुक्यातील साटवली मार्गावरील खावडी-कोंड्ये सीमेजवळील उतारात रस्त्यावर झालेल्या अपघातात निवोशी येथील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 17 मे रात्री ते 18 मे रोजीच्या सकाळच्या दरम्यान घडली.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गुरुदास तांबे (23, रा. निवोशी तांबेवाडी, ता. लांजा) असे अपघातातील मृताचे नाव आहे. तो होंडा युनिकॉर्न (क. एम.एच.06/ए.ई.3821) ही दुचाकी घेऊन साटवली ते लांजा मार्गावर प्रवास करत असताना खावडी-कोंड्ये गावच्या सिमेजवळील उतारात वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीसह तो रस्त्यालगत असलेल्या खोल गटारात पडला. यात गटारात पडल्याने गंभीर दुखापत होऊन राहुल तांबे याचा मृत्यू झाला. ही घटना 17 मे रोजी रात्री 10.30 ते 18 मे रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास घडल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या राहुल तांबे याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी लांजा-साटवली मार्गावर वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताबाबत अधिक तपास लांजा पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.