भोगावती/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील सरवडे गावा पाठोपाठ पुंगाव येथेही गुरुवारी पहाटे सुमारे ६० हजार रुपयांचा गांजा राधानगरी पोलीसांनी सापडला. अमोल आनंदा पाटील (वय२७) याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई पूर्ण केली. यामध्ये ५९ हजार ५२० रुपये किंमतीचा २ किलो ९०० ग्रँम गांजा राधानगरी पोलिसांनी जप्त केला. त्यामुळे तालुक्यात गांजाचा धुर मोठ्या प्रमाणात धुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी मालवे ते बोरवडे रस्त्यावर ६७ हजार २८० रुपये किंमतीचा पावणेचार किलो गांजा सापडला होता.यामध्ये ७ मोटरसायकलीसह ११ मोबाईल असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन याप्रकरणी आठ जणांना अटक केल्याची घटना ताजी आहे.तोपर्यंतच तालुक्यातील पुंगावच्या अमोल आनंदा पाटील याच्या घरातुन ५९ हजार ५२० रुपये किंमतीचा २ किलो ९०० ग्रँम गांजा राधानगरी पोलीसांनी जप्त केला.
याप्रकरणी अमोल पाटीलला ताब्यात घेतले असून चार दिवसांत गांजाबाबतीत पाठोपाठ दुसरी कारवाई झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पो.नि.स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन.ए.खान,अरविंद पाटील आदी अधिक तपास करीत आहेत.