अमित पालेकर यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
वास्कोतील कोळसा आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाकडून आपचे आमदार व्हीन्सी व्हीएगस यांना समन्स बजावण्यात आले आहे. हा राजकीय कट असल्याचा दावा करीत आपचे अध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनी विद्यमान भाजप सरकारकडून आपच्या आमदारांवर भाजपात येण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला.
पणजीतील आपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. पालेकर बोलत होते. यावेळी आपचे नेते वाल्मिकी नाईक उपस्थित होते. कोळसा आंदोलनात भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे आमदार होते. परंतु या आमदारांना कोणतेही समन्स आलेले नाही. केवळ आपच्या आमदारांना लक्ष्य केले जात असून, केवळ भाजपात ओढण्यासाठीच विविध मार्गाने आपच्या नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचे ऍड. पालेकर म्हणाले.
आपचे आमदार दबाव झुगारतील
भाजपने आपचे आमदार व्हीन्सी व्हीएगस व क्रूझ सिल्वा या दोघांनीही भाजपमध्ये यावे म्हणून प्रयत्न चालवले आहेत. हे प्रयत्न यशस्वी होत नसल्यानेच या आमदारांच्या सतावणूक करण्याचे षङयंत्र चालवले जात आहे. परंतु व्हीएगस व सिल्वा हे दबाव झुगारून लावतील, असा विश्वास आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला.