तब्बल महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन : मतदार, नागरिकांशी पक्षनेते साधणार संवाद,’संपर्क से समर्थन’ उपक्रमाचे अनावरण
पणजी : केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत करण्यात आलेले विविध उपक्रम, उपलब्धी आणि विकासात्मक उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘महासंपर्क’ नावाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज दि. 1 जूनपासून पुढील महिनाभर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पक्षाचे मंत्री आणि नेते प्रत्येक मतदारसंघातील 1000 प्रमुख प्रभावशाली मतदार/व्यक्तींशी संवाद साधतील. त्यायोगे ‘संपर्क से समर्थन’ कार्यक्रमांतर्गत त्यांचा पाठिंबा मागणार आहेत. काल बुधवारी पणजीत पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, गोरख मांद्रेकर, सर्वानंद भगत, ऊपेश कामत, प्रेमानंद म्हांबरे यांची उपस्थिती होती. दि. 9 आणि 12 रोजी ‘विकास तीर्थ’ कार्यक्रमांतर्गत प्रसारमाध्यमांसह विकास प्रकल्पांना भेटी देतील. दि. 10 रोजी डिचोली आणि फोंडा मतदारसंघात व्यापारी संमेलने आयोजित करण्यात येतील.
‘संयुक्त मोर्चा संमेलन’
दि. 13 ते 17 दरम्यान भाजप मंडळे ’संयुक्त मोर्चा संमेलन’ आयोजित करतील. या कालावधीत दोन्ही लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता संमेलने होतील. दि. 18 ते 22 पर्यंत भाजप मंडळे केंद्रीय कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची प्रत्येक मंडळात संमेलने आयोजित करणार आहेत. दि. 21 रोजी योग दिन प्रत्येक मंडळात साजरा करण्यात येणार असून त्यावेळी गेल्या 9 वर्षात केलेल्या विकासकामांचे प्रदर्शन मांडण्यात येईल.
डॉ. मुखर्जी बलिदान दिवस
दि. 23 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. 25 रोजी ’मन की बात’ पक्षकार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक बूथवर प्रसारित करण्यात येईल. त्या दिवशी संध्याकाळी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून ’काळा दिवस’ पाळण्यात येईल.
नऊ वर्षांची कार्यपूर्ती
दि. 20 ते 30 दरम्यान मोदी सरकारच्या 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती देणारे पॅम्प्लेट/पुस्तकांचे घरोघरी वाटप करण्यात येईल. त्यावेळी घरमालकाच्या मोबाईल/लँडलाईन क्रमांकावरून 9090902024 वर मिस्ड कॉल देखील देतील. या कार्यक्रमानमित्त केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी आणि राजीव चंद्रशेखर हे देखील गोव्यात येऊन विविध कार्यक्रमात सहभाग घेतील. दरम्यान, महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या देखरेखीसाठी भाजपने विस्तृत व्यवस्था केली आहे. त्यांच्या आयोजनासाठी 5 सदस्यीय मंडळ प्रचार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असे तानावडे यांनी सांगितले.