पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार; तयारीला लागण्याच्या सूचना; शेखर इनामदार यांचा वाढदिवस उत्साहात
सांगली प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत भाजपचे एकहाती बहुमत असताना काही चुकीच्या लोकांमुळे सत्ता गेली. असो पण यापुढच्या निवडणुकीत भाजपला 50 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असे सांगत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी आगामी महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित सत्कार समारंभात शिंदे बोलत होते.
भाजपचे ‘चाणक्य’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस रविवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. येथील नेमीनाथनगर मधील वाडीकर मंगल कार्यालयात इनामदार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पृथ्वीराज देशमुख, शहरजिल्हाध्यक्ष दिपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केवळकर, महापालिकेतील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
इनामदार यांचा वाढ†िदवस भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरला. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमीत्ताने भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणूकीचे रणशिंगही फुंकले. ‘मिशन 50′ चा नारा देत महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. शिंदे म्हणाले, महापालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र काही चुकीच्या लोकांच्यामुळे सत्ता गमवावी लागली. याचे शल्य मनात आहे. यापुढे चुकीच्या लोकांना थारा दिला जाणार नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणूका भाजपाच जिंकणार याबाबत दुमत नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन शिंदे यांनी केले.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने महापालिकेत ‘कमळ’ फुलवले होते. मात्र काहींनी चुका केल्या. यापुढच्या निवडणूकीत त्यांचा हिशोब केला जाईल. आमदार गाडगीळ म्हणाले, यापुढच्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु करावी. सुरवातीला इनामदार यांची सांगली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘शेखर इनामदार आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी संपूर्ण सांगली शहर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले होते. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला.
महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार
इनामदार म्हणाले, देशासह राज्याज भाजपला चांगले वातावरण आहे. माजी आमदार स्व. संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणामध्ये ‘एंट्री’ केली. काम करत असताना पद आहे की नाही याचा विचार केला नाही. सांगलीचा विकास हेच ध्येय होते. येणाऱया महापालिका निवडणुकींमध्ये भाजपचाच विजय होईल. भाजपचीच पुन्हा महापालिकेत सत्ता येईल.