अंदाधुंद गोळीबारात 18 मुलांसह 21 ठार
टेक्सास / वृत्तसंस्था
अमेरिकेतील टेक्सास शहर अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले. एका प्राथमिक शाळेत अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शिक्षक आणि 2 तरुणांचाही समावेश आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांमध्ये बहुतांश दुसरी, तिसरी आणि चौथीतील विद्यार्थी आहेत. तर हल्लेखोर 18 वर्षांचा होता. त्याचे नाव सॅल्व्हाडोर रामोस, असे असून पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात तो ठार झाल्याचे टेक्सासच्या गव्हर्नरांनी सांगितले.
हल्लेखोर व्यक्ती रायफल घेऊन शाळेत घुसला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराने शाळा आवारात बचावासाठी मुलांची प्रचंड धावपळ सुरू होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे 21 निष्पापांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी 2012 मध्ये सँडी हुक एलिमेंटरी स्कूलमध्येदेखील अशीच घटना घडली होती. मात्र, हा हल्ला अधिक प्राणघातक असल्याचे सांगण्यात आले.
टेक्सासमधील उवाल्डे येथे रॉब एलिमेंटरी स्कूल या ठिकाणी अंदाधुंद गोळीबाराचा हा प्रकार घडला आहे. रॉब एलिमेंटरी स्कूल हे टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहरापासून 133 किलोमीटर अंतरावर आहे. उवाल्डे हे 20 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेले शहर आहे. मेक्सिकोच्या सीमेपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर हे छोटे शहर आहे.
रॉब एलिमेंटरी स्कूल ही येथील नामांकित प्राथमिक शाळा असून तेथे 5 ते 11 वयोगटातील मुले शिक्षण घेतात. सध्या या शाळेत 570 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असून दोन दिवसांनंतर मुलांना उन्हाळी सुटी पडणार होती. पण, तत्पूर्वीच घडलेल्या रक्तपाताच्या मोठय़ा घटनेने शहर स्तब्ध झाले आहे. दरम्यान, बंदूकधाऱयाने अंदाधुंद गोळीबार करण्यापूर्वी सोशल मीडियावर रायफल्सचे 2 फोटो व्हायरल केल्याचे आढळून आले आहे. मात्र, हा गोळीबार त्याने का केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कधीही भरून न येणारे नुकसान ः जो बायडेन
गोळीबाराच्या या घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुःख व्यक्त केले आहे. स्वतःचे मूल गमावणे म्हणजे आपला अर्धा जीव गमावल्यासारखेच आहे. तुम्हाला किती दुःख झाले असेल हे मी समजू शकतो. हे नुकसान कधीही भरून येऊ शकत नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. बायडन क्वाड संमेलनासाठी जपान दौऱयावर गेले होते. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच त्यांनी आपली पत्नी जिल हिच्यासह या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.
काही पालकांना आपल्या मुलांना पुन्हा कधीही पाहता येणार नाही, असे सांगत देवाच्या नावावर बंदुकांसाठी लॉबिंग करणे आपण थांबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शस्त्रास्त्रांसदर्भातील नव्या कायद्याच्या मार्गात अडथळा आणणाऱया लोकांची आता वेळ आली आहे. आम्ही हे विसरणार नाही, आम्ही बरेच काही करू शकतो, आम्हाला आता करून दाखवावंच लागेल, हे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे, असेही बायडेन यांनी स्पष्टपणे सांगितले.
नवी गन पॉलिसी हवी ः कमला हॅरिस
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी नवी गन पॉलिसी आणण्याची मागणी केली आहे. देशात अंदाधुंद गोळीबाराच्या घटना वाढत असल्याने आपल्याला वेदना होत आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्यामध्ये निर्णय घेण्याचे साहस असलं पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी एक नवी गन पॉलिसी आणली पाहिजे, असे वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात कमला हॅरिस म्हणाल्या.
बंदूक वापरावर निर्बंधांची तयारी…
18 वषीय मुलगा दुकानात जातो, बंदूक खरेदी करतो, हेच मुळात चुकीचे आहे. अशाप्रकारच्या गोळीबाराच्या घटना जगात अन्यत्र क्वचितच घडतात. आपण या नरसंहारासोबत जगायला का तयार आहोत? आपण असे का होऊ देत आहोत? आता देवाच्या नावावर बंदुकांसाठी लॉबिंग करणे आपण थांबवणार आहे. या वेदना आता कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे.
– जो बायडेन, अमेरिका राष्ट्राध्यक्ष