लंडन / वृत्तसंस्था
लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांना हंगामातील सर्वोत्तम प्रीमियर लीग मॅनेजर म्हणून गौरवण्यात आले. क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने शेवटच्या क्षणी मँचेस्टर सिटीला पिछाडीवर टाकत बाजी मारली.
जानेवारीत लिव्हरपूलचा संघ मँचेस्टर सिटीपेक्षा 14 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, उर्वरित सामन्यांमध्ये त्यांनी 16 विजय व 2 बरोबरी अशा कामगिरीसह 92 गुण मिळवले. यादरम्यान त्यांना दोन पराभव पत्करावे लागले असले तरी अन्य संघांच्या तुलनेत ते बरेच कमी होते. याचा लिव्हरपूलला लाभ झाला.
रविवारी व्हॉल्वरहॅम्प्टन वांडरर्सला 3-1 अशा फरकाने नमवल्यानंतर लिव्हरपूलचा संघ घरच्या मैदानावर पूर्ण हंगामात अपराजित राहिल्याचे स्पष्ट झाले. क्लॉप यांनी हंगामातील सर्वोत्तम मॅनेजर पुरस्कार जिंकण्याची ही कारकिर्दीतील दुसरी वेळ आहे. आता लिव्हरपूलचा संघ शनिवारी युफा चॅम्पियन्स लीग फायनल लढतीत रियल माद्रिदविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी जेतेपदाचा तिहेरी मुकुट संपादन करुन देण्याचे क्लॉप यांचे लक्ष्य असेल. लिव्हरपूलने या हंगामात यापूर्वी ईएफएल कप व एफए कप जिंकले आहेत.