उत्तर प्रदेशमधील दुर्घटना ः भरधाव वेगाचा व्हिडीओ व्हायरल
सुलतानपूर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी कंटेनर आणि बीएमडब्ल्यू कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी बीएमडब्ल्यू कार 230 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुलतानपूर येथे हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला. बीएमडब्ल्यूची विरुद्ध दिशेने येणाऱया कंटेनरला धडक बसली. या अपघातात आनंद प्रकाश (35, रा. देहरी, बिहार), अखिलेश सिंग (35) आणि दीपक कुमार (37, दोघेही औरंगाबाद, बिहार) अशी मृतांची नावे आहेत. तर चौथ्या मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघातापूर्वीचा लाईव्ह व्हिडीओही फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. याप्रसंगी आनंद कुमार आणि त्याचे साथीदार बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. गाडीचा वेग भरधाव होता. दीपक कुमार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह व्हिडीओ सुरू केला. यामध्ये कारचा वेग पहिल्या 100 च्या खाली दिसत आहे. त्यानंतर कार चालवणाऱया व्यक्तीला ताशी 250 किलोमीटरचा वेग वाढवण्यास सांगितले. काही वेळातच वेग 230 पर्यंत पोहोचतो. यानंतर काही वेळातच त्यांची कार कंटेनरला धडकली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आनंद कुमार शुक्रवारी सकाळी डेहरीहून उत्तर प्रदेशातील फैजाबादला रवाना झाले होते. त्यानंतर सायंकाळी उशिराने पूर्वांचल द्रुतगती मार्गावर सुलतानपूरजवळ कंटेनरची धडक बसल्याने बीएमडब्ल्यू कार स्वार डॉ. आनंद प्रकाश यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.