पश्चिम बंगालच्या मालदामध्ये स्फोट
वृत्तसंस्था/ मालदा
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्हय़ात रविवारी पहाटे एका देशी बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. फरजान एसके आणि सफीकुल इस्लाम अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे दोघे शेतात बॉम्ब तयार करत असताना स्फोट झाला होता.
घटनास्थळावरून काही सामग्री सापडली असून त्याचा वापर देशी बॉम्ब तयार करण्यासाठी केला जात होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्फोटके कुठून आली याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच बॉम्ब तयार करण्यामागचा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॉम्ब विरोधी पथक घटनास्थळी पोहोचले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार यादव यांनी सांगितले आहे. यापूर्वी शुक्रवारी या भागातून शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली होती. जमिनीवरून सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधील गटबाजीमुळे मागील काही आठवडय़ांपासून या भागात तणाव असल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.