सेन्सेक्स 240 अंकांनी वधारला : ऑटो निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेतील रोजगाराचे सकारात्मक आकडे आणि ऑटो कंपन्यांची समाधानकारक कामगिरी या जोरावर भारतीय शेअरबाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअरबाजार वधारासह बंद झाला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 240 अंकांनी वधारुन 62,787 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी वाढत 18,593 अंकांवर बंद झाला. बीएसईवर मिडकॅप निर्देशांक 0.29 टक्के वाढत तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.51 टक्के वाढत बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 25 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले होते. ऑटो निर्देशांक 1.23 टक्के, कमोडिटी 0.51 टक्के, ऊर्जा 0.22 टक्के, वित्तीय सेवा 0.31 टक्के तर बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक 0.48 टक्के वधारत बंद झाला होता.
ऑटो आणि कॅपिटल्स गुड्स निर्देशांक 1 टक्का वाढला होता. तर एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांमध्ये विक्री दिसून आली. निफ्टी निर्देशांकाने दिवसभराच्या सत्रामध्ये 18,650 पर्यंत मजल मारली होती. शेवटच्या तासाभरामध्ये समभागांमध्ये विक्रीचा दबाव दिसल्याने तेजीत काहिशी घट पहायला मिळाली. महिंद्रा आणि महिंद्रा, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, लार्सन आणि टुब्रो तसेच ग्रेसिम इंडस्ट्रीज यांचे समभाग दमदार तेजीसह बंद झाले. दुसरीकडे डिव्हिज लॅब्स, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि बीपीसीएल यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारात सोमवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसून आला. अमेरिकेतील बाजारांमध्ये डोव्ह जोन्स निर्देशांक 701 अंकांनी तर नॅसडॅक निर्देशांक 139 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. युरोपियन बाजारदेखील तेजीसमवेत कार्यरत होते.