घरोघरी राबविली मोहीम, मादी जातींच्या वासरांना लस, पहिल्या टप्प्यात 95 टक्के लसीकरण पूर्ण
बेळगाव : ब्रुसेलोसिस या रोगाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील गाई-म्हशींच्या मादी जातींच्या वासरांना लस टोचण्यात आली आहे. 4 ते 8 महिने वयोगटातील 27761 वासरांना ही लस देण्यात आली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील प्रतिबंधक लसीकरण 95 टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे. ब्रुसेलोसिस हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गाय आणि म्हशीच्या वासरांना ही लस दिली जाते. या रोगाची लागण झाल्यास गर्भपात होऊन जनावर दगावण्याची शक्मयता असते. शिवाय या रोगापासून माणसालादेखील धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याने ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली आहे.
रोगमुक्ततेसाठी पशुसंगोपनचे प्रयत्न
जिल्ह्यात अद्याप ब्रुसेलोसिसच्या एकही प्रकरण आढळून आले नाही. मात्र खबरदारी म्हणून खात्याने मोहीम हाती घेतली आहे. लम्पीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रतिबंधक लस वेळेवर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात घरोघरी जाऊन प्रतिबंधक लसीकरण राबविता आली नाही. त्यामुळे बहुतांशी जनावरे लसीकरणापासून वंचित राहिली होती. मात्र आता लसीकरण मोहीम वेळेवर राबवून जनावरांना रोगमुक्त ठेवण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोहीम
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील सर्व पशुपालकांच्या वासरांना लस देण्यात आली आहे. उर्वरित वासरांना येत्या काळात लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 27761 वासरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 27112 गाई-म्हशीच्या वासरांना लस दिली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविली जात आहे. विशेषत: 4 ते 8 महिने वयोगटातील लहान मादी जातीच्या वासरांना लस देण्यात आली आहे.