दोन तोळे सोन्यासह वीस हजाराची रोकड लंपास
वार्ताहर / गुंजी
येथील बापे कॉलनीतील बंद घराचा पाठीमागचा दरवाजा फोडून भरदुपारी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 20 हजाराची रोकड लंपास करून चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना गुरुवारी घडली.
संध्या अनंत पालेकर या दुपारी घराला कुलूप लावून एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. ही संधी पाहून चोरटय़ांनी पाठीमागच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये एका पिशवीत ठेवलेल्या कपाटाच्या चाव्या शोधून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून त्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने, पाच ते सहा तोळय़ाचे चांदीचे दागिने व वीस हजाराची रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.
दुपारी तीनच्या सुमारास शेजाऱयांना या घरात भांडय़ांचा जोरात आवाज आला. त्यांनी तिथे पाहिले असता पाठीमागचा दरवाजा उघडा होता. शिवाय घरात माकडे शिरली होती. जवळ जाऊन पाहिले असता दरवाजा फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संध्या यांना याची माहिती दिली. त्यांनी येऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे उघड झाले. केवळ दीड तासामध्ये ही चोरीची घटना घडल्याने चोरटय़ांनी घरावर पाळत ठेवूनच चोरी केल्याचे बोलले जात आहे. याची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
गावात घबराटीचे वातावरण
बापे कॉलनीमध्ये चोरटय़ांनी केवळ दीड तासामध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे. सध्या सुगीचे दिवस असल्याने गावातील अनेक कुटुंबातील सर्व लोकांना घराला कुलूप लावूनच बाहेर पडावे लागते. मात्र भरदिवसा चोरीच्या घटना घडत असल्यास शेतातील सुगीची कामे कशी करावी, असा प्रश्न समोर उभे राहत आहे. तरी पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.