वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यामध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागात कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. नोव्हेंबर महिन्यासाठी इंग्लंडचा कर्णधार ज्योस बटलर याची सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यामध्ये बटलरची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. त्याचप्रमाणे ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर 20 धावांनी नाटय़मयरीत्या विजय मिळविला होता. बटलरचा हा टी-20 प्रकारातील शंभरावा सामना होता. या सामन्यामध्ये त्याने 47 चेंडूत 73 धावा झोडपल्या होत्या. या कामगिरीमुळे इंग्लंडने या स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यानंतर या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. भारताविरुद्धच्या सामन्यात बटलरने 49 चेंडूत 80 धावा झळकविल्या होत्या. बटलर आणि हॅलेस या सलामीच्या जोडीने 170 धावांची विक्रमी भागीदारी करत आपल्या संघाला 10 गडय़ांनी विजय मिळवून दिला होता. पाकविरुद्धच्या अंतिम सामन्यात बटलरने 26 धावांचे योगदान दिले होते. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुसऱयांदा जिंकली. कामगिरीतील सातत्य राखल्याने बटलरची नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने निवड केली आहे.