वृत्तसंस्था /बेंगळूर
2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात कर्णधार मयांक अगरवालच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर यजमान कर्नाटकाने सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभा केला. गुरुवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर सौराष्ट्रने पहिल्या डावात 2 बाद 76 धावा जमविल्या.
या सामन्यात कर्नाटकाने बुधवारी खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 229 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी गुरुवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या उर्वरित 5 गडय़ांनी 178 धावांची भर घातली. 133.3 षटकात कर्नाटकाचा पहिला डाव 407 धावांवर आटोपला.
सलामीला फलंदाजी करणाऱया अगरवालने 429 चेंडूत 6 षटकार आणि 28 चौकारांसह 249 धावा झळकविल्या. शरदने 4 चौकारांसह 66 धावांचे योगदान दिले. शरद आणि अगरवाल यांनी सहाव्या गडय़ासाठी 139 धावांची भर घातली. कर्नाटकाचे हे दोन फलंदाज वगळता इतर फलंदाजांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सौराष्ट्रतर्फे चेतन सकारिया आणि कुशांग पटेल यांनी प्रत्येकी 3 तर चिराग जेनी आणि पी. मंकड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द्विशतक झळकविणारा अगरवाल शेवटच्या गडय़ाच्या रूपात धावचीत झाला.
त्यानंतर सौराष्ट्रच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पाचव्या षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज स्नेल पटेल खाते उघडण्यापूर्वीच कवीरप्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर कवीरप्पाने सौराष्ट्रला आणखी एक धक्का देताना विश्वराज जडेजाला त्रिफळाचीत केले. त्याने 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. हार्विक देसाई 3 चौकारांसह 27 तर जॅक्सन 6 चौकारांसह 27 धावांवर खेळत आहे. कर्नाटकातर्फे कवीरप्पाने 24 धावात 2 गडी बाद केले. हा उपांत्य सामना पाच दिवसांचा खेळविला जात आहे.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक प. डाव 133.3 षटकात सर्व बाद 407 (मयांक अगरवाल 249, एस. शरद 66, सकारिया 3-73, के. पटेल 3-109), सौराष्ट्र प. डाव 30 षटकात 2 बाद 76 (हार्विक देसाई खेळत आहे 27, जॅक्सन खेळत आहे 27, कवीरप्पा 2-24).