वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसीला ज्युलियस बाएर जनरेजन कप ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याला विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला.
अंतिम फेरीतील पहिली लढत जिंकून कार्लसनने आघाडी घेतली होती. अर्जुनला दुसरी लढत जिंकून लढत टायब्रेकरवर नेणे आवश्यक होते. पण कार्लसनने दुसऱया लढतीतील पहिले दोन डाव जिंकून सामन्याचा निकालही निश्चित केला. पहिल्या लढतीत चार डाव घेण्यात आले. त्यात कार्लसने 2.5-0.5 असा विजय मिळविला. त्यामुळे कार्लसनला जेतेपद निश्चित करण्यासाठी दुसऱया लढतीत फक्त एक सामना अनिर्णीत राखण्याची गरज होती. पण दुसऱया लढतीत त्याने दोन डाव जिंकून अर्जुनचे आव्हान संपुष्टात आणले.
अंतिम फेरीत चार डावांच्या दोन लढती घेण्यात येतात. प्रत्येकाने एकेक लढत जिंकल्यास ब्लिट्झ टायब्रेकद्वारे विजेता ठरविला जातो. दुसरी लढत जिंकून टायब्रेकवर जाण्यासाठी अर्जुनला ही लढत जिंकणे आवश्यक होते. पण 19 वर्षीय अर्जुन फॉर्ममध्ये असलेल्या कालर्ससनसमोर स्वतःच अडचणीत सापडला. त्याने 48 चालीनंतर डाव सोडून दिला. यातील दुसरा डाव 52 चालीत कार्लसनने संपवून अर्जुनचे आव्हान संपुष्टात आणले.
प्राथमिक फेरीतही कार्लसनला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना कठीण गेले. त्याने फक्त एक सामना गमविला. त्याने अमेरिकेच्या हान्स नीमनविरुद्ध दोन चालीनंतर डाव सोडून दिला तर उपांत्यपूर्व फेरीत लेव्हॉन ऍरोनियनविरुद्ध एक डाव गमविला. कार्लसनच्या या कामगिरीमुळे तो 2900 टूर रेटिंग गुण मिळविणारा इतिहासातील पहिला बुद्धिबळपटू बनला आहे. या स्पर्धेतील शानदार प्रदर्शनानंतर अर्जुन इरिगेसी मेल्टवॉटर चेस टूरच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला आहे. याच वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे ही आठ खेळाडूंच्या सहभागाची स्पर्धा होणार आहे.