मध्यरात्रीपासून चर्चमध्ये प्रार्थना : मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून नाताळचा जल्लोष
प्रतिनिधी /बेळगाव
प्रभु येशूचा जन्मदिन असणारा नाताळ हा सण बेळगावसह परिसरात ख्रिस्ती बांधवांनी आनंदात साजरा केला. शनिवारी मध्यरात्रीपासून कॅम्प तसेच इतर परिसरातील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थनेने नाताळाला प्रारंभ झाला. संगीताच्या तालावर रात्रभर नाताळाचा जल्लोष दिसून आला. केवळ ख्रिस्ती बांधवांनीच नाही तर इतर सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्रित नाताळ साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
मध्यरात्री प्रार्थनेने नाताळाला सुरुवात झाली. कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये बेळगाव डायोसीसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देत शांती, स्नेह भाव जपण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर यावर्षीचा नाताळ गरिबांना मदतीचा हात देऊन साजरा करा, असे आवाहन केले. त्यानंतर कॅम्प परिसरात रात्रभर नाताळाचा उत्साह दिसून आला. प्रत्येक चर्चबाहेर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर चर्चला केलेली विद्युत रोषणाई नेत्रदिपक ठरत होती.
कॅम्प येथील सेंट अॅन्थोनी चर्च, इमॅक्युलेट कन्व्हेंशन, सेंट बॅप्टीस्ट चर्च, सेंट जोसेफ चर्च, शहापूर येथील माऊंट कार्मेल चर्च,
मेथॉडिस्ट चर्च, सेंट मेरीज चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यासाठी मध्यरात्रीपासून ख्रिस्ती बांधवांची गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण भागातही नाताळाचा उत्साह दिसून आला. संतिबस्तवाड, वाघवडे, बेळगुंदी, चंदगड व खानापूर या परिसरात नाताळ साजरा झाला.
केकच्या मागणीत वाढ
नाताळला केक कापण्याची पद्धत रुढ असल्याने केकच्या मागणीत मागील दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. आपल्याला आवडीच्या फ्लेवरमध्ये केक उपलब्ध व्हावा यासाठी काही दिवस आधीच केकच्या ऑर्डर देण्यात आल्या होत्या. याचबरोबर ख्रिश्चन बांधवांनी आपल्या घरांमध्ये विविध देखावे, नाताळचे झाड, विद्युत दिवे लावून आनंद साजरा केला.
चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना
फातिमा कॅथेड्रल चर्चसोबतच शहरातील सर्वच चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीय जमा झाले होते. यानिमित्त चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई व देखावे करण्यात आले होते. यावर्षी नाताळादिवशी साप्ताहिक सुटी असल्याने नाताळचा उत्साह पाहण्यासाठी कॅम्प परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. रविवारी सायंकाळी बिशप तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला.