मलकापूर शहरात कडकडीत बंद
संशयिताच्या विरोधात घोषणा देत महिलांसह नागरिकांनी शहरातून प्रमुख मार्गावरून काढली निषेध फेरी
शाहुवाडी प्रतिनिधी
माणुसकीला काळीमा फासणारी आणि एका असहाय्य गरीब , गतिमंद युवतीचा गैरफायदा घेत अमानवी अत्याचार केलेल्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये अशा तीव्र शब्दात मलकापूर येथील गतिमंद मुलीवर अत्याचार केलेला संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे याच्या विरोधात मलकापूर शहरातील महिलांसह नागरिकांनी निषेध फेरी काढून तीव्र निषेध व्यक्त केला .निषेध फेरीत संपूर्ण शहरातील महिला,नागरिक, युवक, युवती सहभागी झाले होते .तर संपूर्ण शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते .
मलकापूर तालुका शाहूवाडी येथे चार दिवसापूर्वी 23 वर्षीय गतिमंद युवतीवर मलकापूर येथीलच अनिल गणपती भोपळे वय 55 यांने अत्याचार केला होता.या घटनेत सदर पीडित युवती गर्भवती असल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. चार दिवसापासून सदर घटना घडल्यानंतर शहरात अतिशय संताप जनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .विशेष करून महिला व युवती यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. संशयित अनिल भोपळे याच्यावर कठोरात कठोर करावी त्याला तात्काळ अटक करून आमच्यासमोर हजर करा. असाह्य ,गतिमंद गरीब युवतीला फसवून तिच्या भावनाशी खेळलेल्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये .अशी संतप्त प्रतिक्रिया निषेध फेरीत महिला व युवतीनी व्यक्त केली .
महिलांच्या डोळ्यात अश्रू आणि संताप
मुळातच सदर पीडित युवती नियतीने दिलेले जिवन विकलांगपणे जगत आहे .आणि त्या अवस्थेत आज तिच्यावर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. तिच्या जगण्याची झालेली दुर्दशा , तिच्यावर झालेला अन्याय आणि एका मानवी कृत्याने आपल्या आई , वडील ,भावाच्या आधाराने जीवन आनंदाने जगत असलेल्या युवतीच्या जीवनात हा दुःखाचा डोंगर उभा करणाऱ्या ‘ नराधमाच्या विरोधात बोलताना महिलांच्या मनात व चेहऱ्यावर तीव्र संताप उमटत होता . तर त्या पिडीत असाह्य युवतीची आजची अवस्था बघून डोळ्यातून अश्रू वाहत होते .विशेष करून युवतींच्या डोळ्यातून देखील बोलताना तीव्र संताप आणि अश्रू ओघळताना दिसत होते.
शहरात कडकडीत बंद
या घटनेचे शहरात चांगलेच पडसाद उमटले असून या घटनेच्या निषेधार्थ व पिडीत युवतीला न्याय मिळण्यासाठी सर्व शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे ‘ स्वयं स्फूर्तीने पुकारलेल्या बंदला सहकार्य केले .व संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. सर्वत्र कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केला .
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिवतीर्थ सुभाष चौक येथून मलकापूर नगर परिषद व कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग या प्रमुख मार्गावर सर्वांनी निषेध फेरी काढून संशयित आरोपाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या .
तपास निपक्षपातीच होणार
दरम्यान सुभाष चौक शिवतीर्थ येथे सर्व शहरवासीय एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करत महिलांनी शहरवासीयांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनावर शहरातील नागरिक युवक ,महिला, युवती यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत . यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे म्हणाले की या तपासात कोणतीही हायगय केली जाणार नाही वरिष्ठ महिला अधिकारीच या घटनेचा तपास करत आहेत. पिडीतेला न्याय देण्यासाठी हा तपास निपक्षपातीपणे केला जाणार आहे .आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई होणारच आहे .कोणत्याही दबावाला पोलीस प्रशासन बळी पडणार नाही . निपक्षपाती आणि सखोल पणे या घटनेचा तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली .