८३ महाविद्यालयाचे १२५७ विद्यार्थी सहभागी
मुरगूड प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हा युवा महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाला. हा सोहळा सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यंदाच्या महोत्सवात ८३ महाविद्यालयाचे १२५७ विद्यार्थी सहभागी झाले. एकूण १५ कला प्रकारात ५ रंगमंचावरती स्पर्धा घेण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड म्हणाले, जिल्हा युवा महोत्सवाचे व्यासपीठ हे आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण करणारे कलाकार निर्मितीचे शाश्वत व्यासपीठ असून गेल्यावर्षी या माध्यमातूनच शिवाजी विद्यापीठाच्या 23 कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळाली याचा विद्यापीठाला सार्थ अभिमान आहे.
कार्यवाह आण्णासो थोरवत, डॉ. डी. के. गायकवाड, जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे सचिव क्रांतीसिंह पवार-पाटील, आजरा नगर पंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी, सुमित चौगुले, कुडित्रेचे युवा नेते देवराज नरके, ऋषिकेश पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी स्वागत मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक वाटचाली विषयी माहिती देऊन महाविद्यालयाच्या प्रगत वाटचालीची माहिती दिली व महोत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.
“खासदार संजय मंडलिक व युवा नेते ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला लोकनेते सदाशिवराव मंडलिक सांस्कृतिक व्यासपीठ मंच हा जिल्ह्यासह राज्यातील अनेक कार्यक्रमांचा साक्षीदार बनेल.” असा विश्वास आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी व्यक्त केला. “महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांना त्यांची कला सादर करण्याचे युवा महोत्सव मोठे व्यासपीठ असल्याचे” असे मनोगत देवराज नरके यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. प्रा. माणिक पाटील यांनी केले. डॉ. शिवाजी होडगे यांनी आभार मानले.
सहभागी महाविद्यालयाची विद्यार्थी / संघांची संख्या
महोत्सवात वक्तृत्व (मराठी-५३, हिंदी-३८, इंग्रजी-३१), वादविवाद-३२, सुगम गायन-२९, भारतीय समुहगीत-२४, एकांकिका-१२, लघुनाटिका-१५, नकला-१२, मुकनाट्य-२०,पथनाट्य-१९, लोकनृत्य-१३, लोककला १५, लोकसंगीत वाद्यवृंद-०८, प्रश्नमंजुषा ३५ जणांनी आपल्या कला सादर केल्या.
उद्घाटन युवा नेत्यांच्या हस्ते
युवा महोत्सवाचे उद्घाटन वीरेंद्र मंडलिक, क्रांतीसिंह पवार-पाटील, अभिषेक शिंपी, सुमित चौगुले, देवराज नरके या युवा नेत्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यत युवा महोत्सवाचे उद्घाटन युवकांच्या हस्ते होण्याचा प्रसंग पहिल्यांदाच पाहील्याचे डॉ. पी. टी. गायकवाड यांनी सांगितले.