ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यावेळी केली.
350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईच्या दक्षिण आणि उत्तर भागात विभागलेला आहे. मुंबई ते कांदिवली असा जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी जवळपास 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या रोडचे दक्षिण भागातील काम सुरू आहे. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून, दुसऱया बोगदाचे काम 91 टक्के पूर्ण झालं आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दरम्यान, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दूर्ग प्राधिकरणाची स्थापना तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करून करून त्याचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. त्याचबरोबर रायगडच्या पायथ्याशी असलेल्या 45 एकर जागेवर शिवसृष्टी उभारली जाईल, त्यासाठी पहिल्याच टप्प्यात 50 कोटींचा निधी देऊ, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.