वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपले शारिरीक शोषण केले, अशी तक्रार सादर करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने आपली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. तिने तसे स्टेटमेंट न्यायालयात सादर केल्याचे बोलले जाते. मात्र, तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून ती मागे घेण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अल्पवयीन कुस्तीपटूच्या काकांनी काही दिवसांपूर्वी कुस्तीपटूवर तिच्या सहकाऱ्यांनी दबाव आणल्याचे प्रतिपादन पत्रकार परिषदेत केले होते. तसेच, ही कथित घटना घडली तेव्हा ती अल्पवयीन नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय सत्य आहे, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार असल्याचे समजते.
न्यायालयाचा अधिकार
तक्रारदाराने न्यायालयासमोर दोन परस्परविरोधी स्टेटमेंटस् दिली असतील तर त्यापैकी कोणते स्टेटमेंट सत्य आहे, हे ठरविण्याचा अधिकार सीआरपीसीच्या अनुच्छेद 164 प्रमाणे न्यायालयाचा आहे, असे तज्ञांचे मत आहे. न्यायालयही हा निर्णय प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच घेते. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सुनावणीनंतर स्थिती स्पष्ट होणार असल्याचे बोलले जाते. आंदोलन करणारे इतर महत्त्वाचे कुस्तीपटू आता त्यांच्या कामावर परतले आहेत.
स्टेटमेंट काय दिले ?
या अल्पवयीन कुस्तीपटूने जे दुसरे स्टेटमेंट न्यायालयाला सादर केले आहे, त्याच्या आशयासंबंधी अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यासंबंधी अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. काही जणांच्या मते तिने ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधातील स्टेटमेंट या नव्या स्टेटमेंटच्या माध्यमातून मागे घेतले आहे. मात्र, या म्हणण्याचा अद्याप कोणत्याही संबंधिताने दुजोरा दिलेला नाही. परिणामी, सध्याच्या परिस्थितीत तिच्या वडीलांनी दाखल केलेली तक्रार कायम असून त्या आधारावर चौकशी झाल्यावर सुनावणी होणार हे निश्चित आहे.