ज्युनियर महिला आशिया चषक : दीपिका सोरेंग, दीपिकाचा प्रत्येकी एक गोल : पुढील लढतीत चिनी तैपेईचे आव्हान
वृत्तसंस्था/ काकामिगाहारा, जपान
येथे सुरु असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाला 2-2 असे बरोबरी रोखले. भारताकडून दीपिका सोरेंग व दीपिका यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. आता, भारतीय महिलांचा पुढील सामना चिनी तैपेईविरुद्ध होणार आहे. दरम्यान, अ गटात भारतीय संघ अव्वलस्थानी असून कोरियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
पहिल्या दोन सामन्यात दणकेबाज विजय प्राप्त केल्यानंतर सोमवारी कोरियाविरुद्ध लढतीत भारतीय महिलांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्याच्या पूर्वार्धात कोरियन संघाने आक्रमक खेळताना दोन गोल केले. युजीन लीने 15 व्या मिनिटाला तर जियॉन चोईने 30 व्या मिनिटाला गोल करत कोरियाला 2-0 असे आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत कोरियन संघ आघाडीवर होता. यानंतर मात्र भारतीय महिलांनी जबरदस्त पुनरागमन करताना कोरियन संघाला बॅकफूटवर ढकलले. 43 व्या मिनिटाला दीपिका सोरेंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. यानंतर, अखेरच्या सत्रात 54 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर दीपिकाने गोल करत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारताला 57 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण या संधीचे रुपांतर गोलमध्ये करण्यात भारताला यश आले नाही. अखेरपर्यंत उभय संघात 2-2 अशी बरोबरी राहिल्याने सामना बरोबरीत संपला.
आता, अ गटातील भारतीय संघाची पुढील लढत चिनी तैपेईविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय महिलांनी उझबेकिस्तानचा 22-0 असा धुव्वा उडवला होता तर मलेशियाला 2-1 असे नमवले होते. अ गटात भारतीय संघ 7 गुणासह पहिल्या स्थानावर असून कोरियन संघ दुसऱ्या स्थानी आहे. गटातील अव्वल व दुसऱ्या स्थानावरील संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत.