विविध शासकिय योजनांचा लाभ उसतोड मजूरांना देणे गरजेचे आहे आणि यासाठी उसतोड कामगारांना ओळखपत्र पुरवण्यासाठी उपक्रम राबवणे महत्वाचे ठरेल असे मत जिल्हाधिकारी राहूल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी व्यक्त केले. ते आज विविध शासकिय यंत्रणाकडून उसतोड कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकित बोलत होते.
सामाजिक न्याय भवन कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या य़ा बैठकीत ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्याचे निर्देश संबंधित विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, “सध्याच्या गळीत हंगामाकरीता “वन नेशन वन रेशन”(One Nation One Ration) अंतर्गत धान्य मिळण्यासाठी जवळच्या तहसीलदार कार्यालयाकडे उसतोड कामगारांनी अर्ज करावेत, तसेच पुढील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी धान्य मिळण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या मदतीने अर्ज करावेत. याकरिता जिल्हा पुरवठा विभाग आपणास योग्य़ ती मदत करेल. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणी करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात येईल” असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. या बैठकीस समितीचे जिल्हास्तरीय सदस्य, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, ऊसतोड संघटनांचे प्रतिनिधी व कोल्हापूर जिल्ह्यातील १४ कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.