प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून औद्योगिक वसाहतींच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करून देखील विकास कामे करण्यात आली नव्हती. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. याकरिता 56 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उद्यमबाग परिसरातील औद्योगिक वसाहत ही राज्यात दुसऱया क्रमांकाची म्हणून ओळखली जाते. राज्यशासनाला मोठय़ाप्रमाणात महसूल मिळवून देण्यात बेळगाव औद्योगिक वसाहतींचा दुसरा क्रमांक लागतो. तरीदेखील या औद्योगिक वसाहतीच्या विकासाकडे प्रशासनाने कानाडोळा केला होता. रस्त्यांची दुरुस्ती, पथदीप आणि पाणीपुरवठा आदी नागरी सुविधा देखील उपलब्ध करण्यास प्रशासन अपयशी ठरले होते. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेवून महापालिकेचे तत्कालीन प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 50 लाखांच्या निधीची तरतूद केली होती. त्यामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतींमधील समस्यांचे निवारण होईल, अशी अपेक्षा होती. पण रस्त्यांची दुरवस्था पाहता मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली रक्कम तटपुंजी आहे.
रस्ते लवकरच होणार चकाचक
मात्र आता औद्योगिक वसाहतींमधील समस्यांचे निवारण लवकरच होणार असून औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांच्या विकासासाठी 56 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. येथील रस्ते काँक्रिटचे बनवून दुतर्फा पेव्हर्स घालण्यात येणार आहेत. तसेच दोन्ही बाजूंनी गटारीचे बांधकाम केले जाणार आहे. याकरिता 56 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. मात्र येत्या काही दिवसांत या कामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील सर्व रस्ते लवकरच चकाचक होणार आहेत.