दिल्ली विद्यापीठ आवारातही संघर्ष ः वाढत्या तणावानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई ः कडक बंदोबस्त तैनात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरात दंगलीवर आधारित ‘इंडिया ः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाच्या (डॉक्युमेंट्री) प्रदर्शनावरून शुक्रवारी दिल्ली विद्यापीठ आवारात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यापूर्वी हैदराबाद युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि जामिया मिलिया इस्लामियामध्येही संघर्षाची ठिणगी पडली होती. बीबीसीचा माहितीपट पाहण्यावर विद्यार्थी ठाम राहिल्याने संबंधितांची धरपकड करण्यात आली. या माहितीपटावर बंदी असल्यामुळे त्याच्या स्क्रीनिंगला परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तरीही विद्यापीठ परिसरात माहितीपट दाखविल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर अटकेची कारवाई केली.
दिल्ली विद्यापीठात शुक्रवारी निर्माण झालेल्या तणावानंतर कला विद्याशाखेजवळ कलम 144 लागू करण्यात आले. विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानंतर गोंधळ झाल्याने काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी एक दिवस आधी गुरुवारी हैदराबाद विद्यापीठात या माहितीपटावरून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्यात वाद झाला होता. तसेच त्यापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया येथेही दोन दिवस तणावाची स्थिती होती. दुसरीकडे, केरळ काँग्रेसने प्रजासत्ताक दिनानिमित्त (गुरुवारी) वादग्रस्त माहितीपट दाखवला.
बीबीसी माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून अन्यत्र झालेल्या गदारोळानंतर विद्यार्थी संघटनांनी दिल्ली विद्यापीठात स्क्रीनिंगची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांच्या या हट्टाग्रहानंतर पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगत फौजफाटा वाढवला होता. तरीही ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते हातात पोस्टर बॅनर घेऊन कला विद्याशाखेत पोहोचले होते. याचदरम्यान काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आधीच बसेसची व्यवस्था केली होती.
विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण
विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देत आवारात माहितीपटाचे सादरीकरण करण्यास अनुमती देण्यात आली नसल्याचे सांगितले. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेकडून कला विद्याशाखेत डॉक्मयुमेंट्री दाखवण्याची योजना असल्याचे ऐकिवात आहे. मात्र, यासाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही. आम्ही असे वर्तन होऊ देणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जामिया मिलिया, जेएनयूमध्ये गोंधळ
24 जानेवारीला डॉक्मयुमेंट्रीच्या प्रदर्शनावरून जेएनयूमध्ये गदारोळ झाला होता. त्यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) विद्यापीठात माहितीपट दाखविण्याची घोषणा केल्यानंतर 25 जानेवारी रोजी जामिया मिलिया इस्लामिया हा गोंधळाचा केंद्रबिंदू बनला होता. वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ही योजना उधळून लावली. येथे आताही कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बीबीसीच्या माहितीपटावरून हैदराबाद विद्यापीठात गुरुवारी संध्याकाळी गदारोळ झाला. येथे 400 हून अधिक विद्यार्थ्यांना वादग्रस्त माहितीपट दाखवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी अन्य विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवला.