21 धावांनी विजय, देव्हॉन कॉनवे, सामनावीर डॅरील मिचेल यांची आक्रमक अर्धशतके
सँटनर, ब्रेसवेलचा भेदक मारा वॉशिंग्टन सुंदरची अष्टपैलू खेळी वाया
वृत्तसंस्था/ रांची
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने डॅरील मिचेल व देव्हॉन कॉनवे यांच्या वेगवान अर्धशतके, ब्रेसवेल, सँटनर, फर्ग्युसन यांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारतावर 21 धावांनी विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 176 धावा जमविल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी मिळविले. त्यानंतर भारताला 20 षटकांत 9 बाद 155 धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकार केला. भारताच्या डावात सूर्यकुमार यादव (34 चेंडूत 47), वॉशिंग्टन सुंदर 28 चेंडूत 50) व हार्दिक पंडय़ा (20 चेंडूत 21) यांच्याव्यतिरिक्त अन्य एकालाही भरीव योगदान देता आले नाही. न्यूझीलंडच्या सँटनरने 11 धावांत 2, ब्रेसवेलने 31 धावांत 2 तर फर्ग्युसनने 33 धावांत 2 बळी टिपले. दुसरा सामना 29 रोजी लखनौमध्ये होणार आहे.
भारतीय कर्णधार हार्दिक पंडय़ाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. फिन ऍलन व कॉनवे यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून देताना 4.2 षटकांतच 43 धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने भारताला पहिले यश मिळवून देताना ऍलनल 35 धावांवर बाद केले. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल टिपला. कॉनवेने 23 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार, 2 षटकार मारले. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मार्क चॅपमनचा झेल सुंदरने स्वतःच टिपत त्याला माघारी धाडले. यावेळी न्यूझीलंडची स्थिती 2 बाद 43 अशी होती.
कॉनवेने नंतर ग्लेन फिलिप्सच्या साथीने तिसऱया गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी करून 13 व्या षटकांत संघाला शतकी मजल मारून दिली. फिलिप्सने 22 चेंडूत 17 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या डॅरील मिचेलने कॉनवेसमवेत जोरदार फटकेबाजी करीत संघाला पावणेदोनशेची मजल मारून दिली. यापैकी मिचेल जास्त आक्रमक खेळत होता. त्याने अर्शदीपने टाकलेल्या शेवटच्या षटकात 3 षटकारांसह 27 धावा फटकावल्या. 18 व्या षटकांत कॉनवे अर्धशतक पूर्ण झाल्यावर बाद झाला. अर्शदीपनेच त्याचा बळी मिळविला. त्याने 35 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 52 धावा फटकावल्या आणि मिचेलसमवेत 36 धावांची भर घातली. मिचेलने अखेरच्या षटकात जबरदस्त फटकेबाजी करीत तीन षटकारांसह एकूण 27 धावा वसूल करताना आपले अर्धशतकही पूर्ण केले. तो 59 धावांवर नाबाद राहिला. त्याने केवळ 30 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी केली.
अर्शदीपने पहिल्या दोन षटकात 24 धावा दिल्या होत्या. पण 4 षटकाअखेर त्याचे पृथक्करण 4-0-51-1 असे झाले. वॉशिंग्टन सुंदरने सर्वात किफायतशीर मारा करीत 4 षटकांत 22 धावा देत 2 बळी मिळविले. याशिवाय कुलदीप यादव व शिवम मावी यांनी एकेक बळी मिळविले. उमरान मलिकने एका षटकात 16 धावा दिल्यानंतर हार्दिकने त्याला पुन्हा गोलंदाजी दिली नाही. स्वतः हार्दिकनेही एकही बळी न मिळविता 3 षटकांत 33 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकांत 6 बाद 176 ः ऍलन 35 (23 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), कॉनवे 52 (35 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), चॅपमन 0, ग्लेन फिलिप्स 17 (22 चेंडूत 1 चौकार), डॅरील मिचेल नाबाद 59 (30 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), ब्रेसवेल 1, सँटनर 7 (5 चेंडूत 1 चौकार), सोधी नाबाद 0, अवांतर 5. गोलंदाजी ः सुंदर 2-22, अर्शदीप 1-51, कुलदीप यादव 1-20, शिवम मावी 1-19.
भारत 20 षटकांत 9 बाद 155 ः सुंदर 50 (28 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), सूर्यकुमार यादव 47 (34 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), हार्दिक पंडय़ा 21 (20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), दीपक हुडा 10 (10 चेंडूत 1 षटकार) अवांतर 10. गोलंदाजी ः सँटनर 2-11, ब्रेसवेल 2-31, फर्ग्युसन 2-33, सोधी 1-30, डफी 1-27.