उमेदवारी अर्ज भरणाऱयाला मतदारयादी मिळणार
वाराणसी / वृत्तसंस्था
पुढील महिन्यात होणाऱया काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या नेत्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 हजार मतदारांची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी 20 सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल, असे काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांनी सातत्याने राजीनामे दिले आहेत, अशा स्थितीत उर्वरित नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष हायकमांडने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱया नेत्यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्यातील 10 प्रतिनिधींची यादी पाहता येईल. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करून मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे सुपूर्द होताच नेत्यांना प्रतिनिधींची संपूर्ण यादी मिळेल, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे. जर एखाद्या नेत्याला वेगवेगळय़ा राज्यातून 10 अनुमोदक मिळवायचे असल्यास 20 सप्टेंबरनंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक नेते या यादीतून आपले 10 अनुमोदक निवडू शकतात आणि त्यांची स्वाक्षरी करून पाठिंबा मिळवू शकतात. त्यानंतर 24 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. मात्र, ही मतदारयादी सार्वजनिक केली जाणार नाही, असे मिस्त्री पुढे म्हणाले.