ईडीचा वापर करून गैरप्रकार केल्याचा आरोप : तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी/बेळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार ईडीचा वापर करून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या विरोधात काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन भाजप सरकार विरोधात निदर्शने केली. याचबरोबर राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीमार्फत चौकशी लावून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वास्तविक भाजप सरकारतर्फेच अनेक भाजपचे नेतेमंडळी भ्रष्टाचार करत आहेत, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. भाजपमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी ईडीमार्फत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
काँग्रेस भवनपासून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहराध्यक्ष राजू सेठ, चिकोडीचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, आर. पी. पाटील, प्रदीप एम. जे., पंचनगौडा द्यामनगौडर, मलगोंडा पाटील, किरण पाटील, बसवराज शेगावी, शोएब अख्तर, इरफान अख्तर, राजा सलीम मोकाशी, मन्सुर सय्यद, कार्तिक पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.