प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा विश्वास
पणजी : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपर्वी झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय संपादन केला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक म्हणजे देशातील राजकारणाला नवी दिशा देण्याचे संकेत आहेत, असेही पाटकर म्हणाले. कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर बेंगळूरहून काल शुक्रवारी गोव्यात परतल्यानंतर विमानतळावर पाटकर पत्रकारांशी बोलत होते. पाटकर यांना म्हादई प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने विधानसभा निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्यामुळे गोवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्नाटकातील काँग्रेस नेत्याचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही बेंगळूरला गेलो होतो. आपल्या सोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव होते, असेही पाटकर म्हणाले. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला नवे बळ मिळाले आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष नव्या जोमाने आणि नव्या दमाने काम करेल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दोन जागा जिंकेल, इतकेच नव्हे तर राज्यात पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता येईल. जनतेला खरे काय आणि खोटे काय ते कळून चुकले आहे. मतदार येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतील आणि काँग्रेसला विजयी करतील, असेही पाटकर म्हणाले.