त्रिपुरात, मेघालय, नागालँडसह पोटनिवडणुकांचाही निकाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी गुरुवार, 2 मार्च रोजी होणार आहे. ईशान्येतील या तीन राज्यांबरोबरच सहा राज्यांमधील पोटनिवडणुकांचा निकालही गुरुवारी जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आली असून दुपारपर्यंत निकालाचे परिणाम स्पष्ट होणार आहेत. सायंकाळपर्यंत सर्व राज्यांमधील अंतिम निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.
त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तीन राज्यातील निवडणुकांबरोबरच सहा राज्यांमधील पोटनिवडणुकाही पार पडल्या आहेत. या पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. येथेही मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी होणार आहे.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 60 जागा असून सध्याच्या विधानसभांचा कालावधी मार्चमध्येच संपत आहे. सध्या त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. तर नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे राज्य आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पक्षाची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या मतदानाअंती येथे जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता गुरुवारी होणाऱया मतमोजणीअंती अधिकृत निकाल देशाला समजणार आहे.