वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2007 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यातील शेवटच्या षटकात मध्यमगती गोलंदाज जोगींदर शर्माने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. 39 वर्षीय जोगींदर शर्माने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्त जाहीर केली आहे.
जोगींदर शर्माने 2004 ते 2007 या कालावधीत चार वनडे आणि 4 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना एकूण पाच गडी बाद केले. 2002 ते 2017 या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत जोगींदर शर्माने राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणा संघाचे प्रतिनिधीत्व केले. 2007 च्या आयसीसीच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधार धोनीने शेवटचे षटक टाकण्यासाठी चेंडू जोगींदर शर्माकडे सोपवला होता. जोगींदर शर्मा याला म्हणावा तसा अनुभव नसतानाही धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवत या कामगिरीसाठी पाचारण केले होते. जोगींदर शर्माने हे शेवटचे षटक टाकले. दरम्यान या षटकात पाकच्या मिसबाह उल हकने फटका मारून धावा घेतल्या. पाकला चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची जरुरी होती. जोगींदरच्या चेंडूवर मिसबाहने चुकीचा फटका मारला श्रीशांतने अप्रतिम झेल टिपल्याने भारताला या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाले होते. जोगींदर शर्माच्या क्रिकेट कारकीर्दीतील भारतातर्फेचा हा शेवटचा सामना ठरला. क्रिकेट क्षेत्रातून बाजूला झाल्यानंतर तो हरियाणामध्ये पोलीस सेवेमध्ये दाखल झाला. तसेच त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधीत्व केले होते. कोरोनाच्या कालावधीत जोगींदर शर्मा हरियाणामध्ये पोलीस उपआयुक्तपदावर कार्यरत होता.