पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, वनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गोकाक फॉल्सच्या खालील काठावर रविवारी एका मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मगर धबधब्याजवळच आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मगरीला पकडण्यासाठी वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली असून सोमवारी या शोधमोहिमेला यश येणार का? हेच आता पहावे लागणार आहे.
दरम्यान, धबधब्यामध्ये ही मगर कोठून आली, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दूधगंगा, वेदगंगा या नद्यांमध्ये सातत्याने मगरींचे दर्शन होते. मात्र चक्क गोकाक धबधब्याखाली मगर आढळून आल्याने भीती निर्माण झाली आहे. ही मगर घटप्रभा नदीच्या प्रवाहातून आली आहे की आणखी कोठून? याबाबत संभ्रम आहे. मात्र, वनखात्याने लवकरात लवकर मगरीला पकडण्यासाठी उपाययोजना राबवून तिला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने धबधब्याचा प्रवाह अद्याप सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ देखील आहे. त्यामुळे कोणाला धोका पोहोचण्यापूर्वी या मगरीला पकडून पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.