सी. एम. इब्राहिम यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघात निजदचे उमेदवार असणार आहेत. आगामी निवडणुकीत 123 जागांवर विजयी होण्याचे उद्दिष्ट आहे. स्वबळावर निजद सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी रविवारी बेळगाव येथे व्यक्त केला.
सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना इब्राहिम पुढे म्हणाले, भाजप, काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न आहेत. एकटे 40 टक्के तर दुसरे 20 टक्क्मयाचे आहेत. आम्ही कोणालाही शिवी देणार नाही. निजद सत्तेवर आल्यावर काय करणार आहे, हे लोकांना समजावून सांगण्याचे काम आम्ही करत आहोत.
निजद सोडून भाजपच्या वाटेवर असणाऱया नेत्यांवर जहरी टीका करून मराठा व लिंगायत समाजाला सोबत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. उमेदवारी देतानाही या सर्व गोष्टींचा विचार होणार आहे. निजद हा राष्ट्रीय पक्ष नाही. प्रादेशिक पक्ष आहे. राज्यातील समस्या सोडविण्याला आमचे प्राधान्य असणार आहे. पंचरत्न यात्रेच्या माध्यमातून जागृती हाती घेण्यात आल्याचेही इब्राहिम यांनी सांगितले.
कुमारस्वामींचा निर्णय अंतिम
रमेश जारकीहोळी निजदमध्ये येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना यासंबंधी चर्चा झालेली नाही. कुमारस्वामी हेच याविषयी निर्णय घेतील. स्थानिक नेत्यांनी होकार दिल्यास कोणीही आपल्या पक्षात आले तरी त्यांचे स्वागतच आहे. आम्ही रमेश जारकीहोळी यांच्या बाजूने नाही आणि त्यांच्याविरोधातही नाही, असेही इब्राहिम यांनी सांगितले.