वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सोमवारपासून सुरू झालेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय-2 टेनिस स्पर्धेत झेकच्या पेत्र क्विटोव्हाने एकेरीत विजयी सलामी देताना रशियाच्या रिबेकिनाचा पराभव केला. त्याचप्रमाणे टिचमन, ब्राझिलची बियाट्रिझ माईया यांनीही दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या विभागात ब्रिटनच्या डेपरने तसेच अमेरिकेच्या मॅकडोनाल्डने प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी दिली.
सोमवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात झेकच्या पेत्रा क्विटोव्हाने रशियाच्या 23 व्या मानांकित रिबेकिनाचा 6-3, 7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. गेल्या वषी ओस्ट्राव्हा येथे झालेल्या स्पर्धेत रिबेकिनाने क्विटोव्हाला पराभूत केले होते. या मागील पराभवाची परतफेड क्विटोव्हाने ऍडलेड स्पर्धेत केली आहे. झेकच्या क्विटोव्हाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्वीसच्या जिल टिचमनने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 7-5, 6-4, अमेरिकेच्या डॅनियली कॉलिन्सने प्लिस्कोव्हाचा 6-2, 6-4, ब्राझिलच्या बियाट्रिझ माईयाने रुमानियाच्या सिरेस्टीचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. पोलंडची टॉप सीडेड इगा स्वायटेक तसेच तृतीय मानांकित जेसिका पेगुला यांनी ऍडलेड स्पर्धेतून माघार घेतली आहे. अलीकडेच मेलबर्नमध्ये झालेल्या पहिल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत या दोन्ही टेनिसपटूंनी आपल्या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत अमेरिकेने जेतेपद मिळविले.
ऍडलेड स्पर्धेतील पुरुषांच्या विभागात ब्रिटनच्या जॅक डेपरने इटलीच्या सोनेगोचा सरळ सेट्समध्ये तर अमेरिकेच्या मॅकडोनाल्डने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 7-5, 7-5 असा पराभव करत विजयी सलामी दिली.