वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यमान विश्वविजेत्या जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध राऊरकेला येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी सामन्यांसाठी भारतीय हॉकी संघासाठी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड जॉन तसेच व्ही. जे. करिअप्पा त्याचप्रमाणे शिवेंद्रसिंग यांची हंगामी हॉकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे.
भारतामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारताची कामगिरी निकृष्ट झाल्याने ऑस्ट्रेलियाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्या होता. या घटनेनंतर हॉकी इंडियाने गेल्या काही दिवसापासून भारतीय पुरुष हॉकी संघाकरिता प्रशिक्षक शोध मोहीम सुरू केली होती पण जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी प्रो लिग सामन्यांसाठी हॉकी इंडियाने डेव्हिड जॉन आणि करिअप्पा यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. सदर माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली आहे.
प्रो लिग हॉकी सामन्यांसाठी 20 जणांच्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रित सिंगकडे सोपवण्यात आले असून हार्दिक सिंग उपकर्णधार म्हणून राहिल. या संघामध्ये अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेस, पवन, जुगराज सिंग, निलम संजीब झेस, जर्मनप्रित सिंग, सुमित, मनजित, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, एम. रविचंद्र सिंग, विष्णुकांत सिंग, दिलप्रित सिंग, समशेर सिंग, राजकुमार पाल, यंग कार्ती, सुखजित सिंग, अभिषेक आणि गुरुजंत सिंग यांचा समावेश आहे.
भारत आणि जर्मनी यांच्यातील प्रो लिग स्पर्धेतील पहिला सामना 10 मार्चला होणार असून 11 मार्चला जर्मनी वि. ऑस्ट्रेलिया, 12 मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया, 13 मार्चला भारत वि. जर्मनी, 14 मार्च जर्मनी वि. ऑस्ट्रेलिया तर 15 मार्चला अंतिम सामना खेळवला जाईल.