ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली असून, चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.कसब्यात सोळाव्या फेरीअखेर धंगेकर यांनी 6957 मतांची आघाडी घेतली असून, त्यांना 60657 मतं आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप तेराव्या फेरीअखेर 8190 मतांनी आघाडीवर आाहेत. त्यांना या फेरीअखेर 45450 मतं पडली आहेत.
कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात दुरंगी लढत झाली होती. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, मविआकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. सकाळी 8 वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा या दोन संस्थांच्या एक्झिट पोलनुसार कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होतील, असं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या हाती आलेल्या निकालानुसार हे पोल खरे ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारपर्यंतच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.