राजस्थानात जगातील सर्वात उंच शिवप्रतिमेचे लोकसमर्पण करण्यात आले आहे. या प्रतिमेला ‘स्टॅच्यू ऑफ बिलीफ’ असे नाव देण्यात आले असून शनिवारी दुपारी चार वाजता जगप्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत मुरारी बापू यांच्या हस्ते हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. योगगुरु बाबा रामदेव यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही आले होते.
या शिवप्रतिमेची उंची 351 फूट असून चार भिन्न उंचींवरुन तिचे दर्शन घेतले जाऊ शकते. प्रतिमेवर 351 फुटांच्या उंचीवरुन अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी 280 फूट उंचीवर काचेचा सेतू बनविण्यात आला असून अन्य अनेक सोयी भाविकांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. 280 फूट उंचीवर भगवान शिवाच्या डाव्या खांद्यापर्यंत पोहचता येते. अभिषेक करण्यासाठी विशेष अनुमतीची आवश्यकता आहे. 18 ऑगस्ट 2012 या दिवशी नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर या प्रतिमेचा पाया घातला गेला. त्यानंतर आज 10 वर्षांनी प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पाया आणि लोकार्पण हे दोन्ही कार्यक्रम मुरारी बापूंच्या हस्ते झाले आहेत.
या शिवप्रतिमेचे निर्माण कार्य तत् पद्म उपवन संस्थान नाथद्वाराचे प्रमुख विश्वस्त मदन पालीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी चार लिफ्टस् बसविण्यात आल्या असून अगदी वरच्या भागात जाण्यासाठी 700 पायऱयांचीही सोय करण्यात आली आहे. एकंदर साधारणतः 100 एकर परिसरात ही शिवप्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. 20 किलोमीटर अंतरावरुनही तिचे दर्शन होऊ शकते. या प्रतिमेच्या लोकर्पण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी केवळ भारतातून नव्हे, तर अमेरिका आणि ब्रिटनमधूनही शिवभक्त आले होते. लोकार्पण कार्यक्रमानंतर आता पुढचे नऊ दिवस शिवभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या स्थानी कडोकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून हेलिकॉप्टरमधूनही लक्ष ठेवण्यात येत आहे.