वार्ताहर /किणये
देसूर-राजहंसगड रस्त्यावरील सुळगे (येळ्ळूर) क्रॉसनजीकचे वळण धोकादायक बनले आहे. या वळणाच्या तिन्ही बाजूंनी झाडाझुडूपांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे समोरून येणाऱया वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बेळगाव-पणजी महामार्गापासून देसूर क्रॉस येथून राजहंसगड, नंदिहळ्ळी आदी गावांना रस्ता जातो. या रस्त्यावर वाहनधारकांची नेहमी गर्दी असते. देसूर व राजहंसगड गावांच्या मध्यभागी सुळगे (येळ्ळूर) गावाकडे जाणारा रस्ता जोडला गेला आहे. याच ठिकाणी सदर वळण असून हे वळण सध्या धोकादायक बनल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
देसूर, राजहंसगड, सुळगे, येळ्ळूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, गर्लगुंजी, के. के. कोप्प आदी भागातील वाहनधारक या रस्त्यावरून ये-जा करतात. तसेच इतिहासकालीन किल्ले राजहंसगडावर येणाऱया शिवभक्तांची संख्याही अधिक आहे. शनिवार व रविवारी राजहंसगडावर शिवप्रेमींची गर्दी असते.
सदर वळणाच्या आजूबाजूला झाडेझुडूपे वाढली आहेत. त्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे. ग्रा. पं. व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी पाहणी करून झाडाझुडूपांची सफाई करण्याची आवश्यकता आहे.
सूचना फलकही आवश्यक
या रस्त्यावरील सुळगे क्रॉसनजीकचे वळण झाडेझुडूपे वाढल्याने धोकादायक बनले आहे. समोरून येणाऱया वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. या भागात वीट व्यवसाय असल्याने ट्रक वाहतूक असते. या भागातील लोक काम-धंद्यानिमित्त बेळगावला ये-जा करतात. वळणाच्या ठिकाणी बाजूला मार्गदर्शक सूचना फलक लावण्याची गरज आहे. मोठा अपघात होण्याआधी झाडाझुडूपांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.
रघुनाथ सावंत, देसूर