तारिहाळ येथे काँग्रेस अनुसुचित जाती-जमाती विभागाचा मेळावा
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेने पहिल्यांदा लक्ष्मी हेब्बाळकर यांना विजयी केले. त्यावेळी कोणतीही कामे पाहिली नव्हती. आता आमदार म्हणून त्यांनी अनेक विकासकामे राबविली आहेत. ही कामेच त्यांच्या विजयाची पायरी ठरणार आहे. या निवडणुकीत उच्चांकी मतांनी त्यांना विजयी करण्याचा संकल्प करा, असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
मंगळवारी तारिहाळ येथे काँग्रेस अनुसुचित जाती-जमाती विभागाचा मेळावा झाला. दीपप्रज्वलीत करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक खोटी आश्वासने दिली आहेत. काँग्रेसने उभारलेल्या अनेक संस्थांची विक्री केली जात आहे. भाजप सरकारने एकही नवे विद्यापीठ, इस्पितळ किंवा रेल्वेमार्ग सुरू केला नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अनिकेत राज, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, अनुसुचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष अनंतकुमार बॅकुड आदी उपस्थित होते. या निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 10 ते 12 जागांवर तर राज्यात 120 हून अधिक जागांवर विजय मिळवायचे आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.