वृत्तसंस्था /केक्सिस डो सुल (ब्राझील)
24 व्या डेफलीपिक्स नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज धनुष्य श्रीकांतने पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल्स नेमबाजीत सुवर्णपदक तर शौर्य सैनीने कास्यपदक पटकाविले. बुधवारपासून या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपल्या मोहिमेला प्रारंभ करताना पहिल्या दिवशी दोन पदके मिळविली. पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल्स नेमबाजी प्रकारात धनुष्य श्रीकांतने 247.5 गुणांसह सुवर्णपदक तर कोरियाच्या किम वू याने रौप्यपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात भारताच्या शौर्य सैनीने 224.3 गुणांसह कास्यपदक घेतले. या स्पर्धेमध्ये एकूण विविध देशांचे सुमारे 65 स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत आठव्या स्थानावर असून त्यांनी दोन सुवर्ण आणि एक कास्यपदक मिळविले आहे. युक्रेनने आघाडीचे स्थान मिळविताना 19 सुवर्ण, 6 रौप्य आणि 13 कास्यपदके पटकाविली आहेत. 2017 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कास्य अशी एकूण पाच पदके मिळविली आहेंत.