शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जिल्हाभर झंजावात : जिल्ह्यातील शिवसैनिकांशी साधला जातोय संवाद : आमदारांच्या बंडखोरीनंतर भक्कम संघटनात्मक बांधणीची मोहीम सुरु : खासदार संजय मंडलिकांसह दोन जिल्हा प्रमुख ऍक्टिव्ह : संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांची पायाला भिंगरी : माजी आमदारांचे ‘वेट अँड वॉच’
कृष्णात चौगले/कोल्हापूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. सर्व जिल्हा प्रमुखांसह अन्य प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेऊन शिंदे गटासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना वगळून शिवसेनेची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याची त्यांनी सूचना दिली आहे. त्यानुसार खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, शहर प्रमुख सुनील मोदी (उत्तर), रवि इंगवले (दक्षिण) आदी सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि शहरात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संपर्क दौऱ्यात त्यांना शिवसैनिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.
आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली असून मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी दिल्या जात आहे. तर राज्यात ज्या मतदारसंघातील आमदारांनी बंडखोरी केली आहे अशा मतदारसंघात शिवसेनेच्या मेळाव्यांना भर पावसात हजारोंची गर्दी जमत आहे. लाभाचे पद उपभोगणाऱया बंडखोर शिवसैनिकांपेक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आचार, विचार प्रमाण मानून जगणाऱ्या शिवसैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच सेनेसाठी झोकून देऊन काम करणारे नव्या दमाचे सैनिक संघटनेत सहभागी होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनामुळे तर सर्वसामान्य जनमाणसांच्या मनातही सेनेचे प्रतिबिंब पहावयास मिळत आहे.
सेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख अशी रचना आहे. युवा सेना, महिला संघटनेसह अन्य अंगिकृत संघटनेमध्येही हीच रचना पहावयास मिळते. त्यामुळे मातोश्रीवरून आलेला प्रत्येक आदेश आणि सूचना तळागाळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. जिह्यात ज्या नेत्याचा स्वतःचा गट आहे, अशा नेत्यांना शिवसेनेकडून विधानसभेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली.
सेनेच्या चिन्हावर काहींनी मैदान देखील जिंकले. पण आज शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी ‘नरोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांच्याकडून कोणतेही योगदान दिले जात नाही. पण खासदार मंडलिक यांच्यासह दोन जिल्हा प्रमुख, शहरप्रमुखांसह अन्य निष्ठावंत शिवसैनिकांकडून जिल्हा पिंजून काढला जात आहे. गेले काही दिवस गावागावात होत असलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना पाठींबा दिला जात असून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांकडून बंडखोरांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे चित्र आहे. ‘आम्हाला थोडा वेळ द्या, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ’ अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत.
माजी आमदारांचे ‘वेट अँड वॉच’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेच्या माजी आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांनी अद्याप आम्ही शिवसेना सोडलेली नाही अशी भूमिका घेतली असली तरी ते अद्याप ‘वेट अँड वॉच’ मोडवर आहेत.
बंडखोर आमदारांना धास्ती
शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर हातात शिवबंधन बांधलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटासोबत गेले आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर त्यांना राज्यातून पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा आपल्याला फटका बसणार काय ? याची बंडखोर आमदारांनी धास्ती घेतली असून त्याबाबत मतदारसंघातून कानोसा घेतला जात आहे.
गुरु पौर्णिमेनिमित्त शेकडो शिवसैनिक जाणार मातोश्रीवर
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (13 रोजी) माझ्यासह जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा त्यांच्याकडून ठाकरे यांना शब्द दिला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
शुक्रवारी शिवसेनेचा व्यापक मेळावा
शिवसेनेतील बंडखोरी आणि सत्तांतर नाट्य़ानंतर जिल्ह्यात शुक्रवारी (15 रोजी) शिवसेनेचा व्यापक मेळावा होणार आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्यासह तिन्ही जिल्हाप्रमुख, दोन खासदार आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. संगीतसुर्य केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये हा मेळावा होणार आहे.
चला गद्दारांना धडा शिकवू
‘चला गद्दारांना धडा शिकवू’ या टॅगलाईनखाली जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांकडून मोहिम हाती घेतली जाणार आहे. यामध्ये मेळावे घेऊन आणि सोशल मिडियाद्वारे बंडखोर आमदारांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली जाणार आहे.