ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. मंगळवारी पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. श्रीनगर (Srinagar) शहरातील लालबाजार भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुश्ताक अहमद असे शहीद जवानाचे नाव आहे. दरम्यान परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल बाजार परिसरातील जीडी गोयंका शाळेजवळ दहशतवाद्यांनी पोलीस नाका पार्टीवर गोळीबार केला. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अबू बकर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
हे ही वाचा : महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक मनसे स्वबळावर लढणार