राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षणार्थींचा शपथविधी सोहळा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म, भेद यांना थारा न देता आपले कर्तव्य पालन करा. कर्नाटक पोलीस खाते हे अत्यंत शिस्तबद्ध खाते म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम होऊन हीच परंपरा पुढे चालवा, असे आवाहन केएसआरपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी केले.
मार्केट यार्ड रोडवरील राज्य राखीव दलाच्या मैदानावर झालेल्या राज्य राखीव दलाची सातवी तुकडी व अतिरिक्त पोलीस प्रशिक्षण केंद्र शिग्गाव येथील तिसऱया तुकडीतील प्रशिक्षणार्थींच्या शपथविधी सोहळय़ात ते बोलत होते. प्रशिक्षणार्थींनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन केएसआरपीमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणार्थींनी आपले आरोग्य सांभाळावे, कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता उत्तम जीवन जगावे, असा कानमंत्र दिला.
प्रारंभी बेळगावसह तुमकूर, मंगळूर, शिमोगा, गुलबर्गा, दक्षिण कन्नड, म्हैसूर, रायचूर, उडुपी, बेंगळूर, हासन, बेळगाव आणि शिग्गावच्या केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थींनी शानदार पथसंचलन केले. केएसआरपी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगावे यांनी शपथ देवविली. तसेच इनडोअर व आऊटडोअर स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थींना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमात केएसआरपी पोलीस महानिरीक्षक रवी. एस., उपपोलीस महानिरीक्षक एम. व्ही. रामकृष्णप्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, केएसआरपी दुसऱया दलाचे कमांडंट हमजा हुसेन, पोलीस कर्मचारी व प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.